जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात तीन सामान्य नागरिक आणि एक भारतीय जवान शहीद झाला. या गोळीबारात दोन इतर जवानही गंभीररित्या जखमी झाले. रविवारीही पाकिस्तानकडून हा प्रकार सुरूच होता. यातही एक जवान शहीद झाला. पाकच्या गोळीबारात जानेवारी २०१८ मध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. जो २०१७ मध्ये पूर्ण वर्षभरांत झालेल्या मृतांच्या संख्येइतका आहे. गतवर्षी लष्करातील जवानांसह सुमारे १२ लोकांचा मृत्यू झाला होता तर ३६ जण जखमी झाले होते. एलओसीवरील संवेदनशील स्थिती लक्षात घेऊन राज्य पोलिसांनी रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्याचबरोबर सीमेवर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे.

सीमेलगत असलेल्या पाचही जिल्ह्यातील डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कठुआ ते परगाल या तीन किमीपर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थित गावांमध्ये सुमारे १५ ते २० हजार लोक राहतात. या लोकांना आधीच सुरक्षित स्थानी आणि बुलेटप्रूफ बंकरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर राज्य सरकारने सीमेजवळ पाच किमी अंतरापर्यंतच्या ५०० शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानी रेंजर्स भारतीय लष्कराच्या चौक्या आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य करत आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पाकिस्तानने डागलेल्या मोर्टार आणि गोळीबारात लष्कराचे दोन जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन अधिकारी शहीद झाले. शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सीमेजवळील ३५ हजारांहून अधिक लोकांना परिसर सोडावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबारामुळे सहा जवान आणि सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून लष्कराच्या जवानांसह सुमारे ६० लोक जखमी झाले. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सेनेच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या कारवाईत पाकिस्तानचे किमान ६ रेंजर्स ठार झाल्याचे सांगण्यात येते.