भीषण पूर संकटाचा सामना करणाऱ्या केरळमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधल्या १४ पैकी ११ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासारागॉड या तीन जिल्ह्यांना रेड अलर्टमधून वगळण्यात आले आहे. केरळमधल्या या महापूरात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

अजूनही असे अनेक भाग आहेत जिथे लोक अडकून पडले आहेत. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी मदत छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २० हजार नागरिकांची सुटका करण्यात आली. ९०० जणांना एअर लिफ्ट करण्यात आले. देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला धन-धान्याच्या रुपाने मदत पाठवण्यात येत आहे.

महाराष्ट्राकडून आर्थिक मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही घोषणा केली. केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केरळी जनतेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या कठिण प्रसंगात केरळी जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

केरळच्या मदतीला पुणेकर धावले
पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे. पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर आज शनिवारी दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.