आसाममधील जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता (रेड कार्ड) दाखविला असल्याचा दावा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील बोडो प्रांतात झालेल्या हिंसाचाराकडे यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी अनेक दशके मूकपणे पाहिल्याचा आरोपही या वेळी मोदी यांनी केला.

फुटबॉल हा आसाममधील लोकप्रिय खेळ आहे, त्यामुळे त्या खेळातील रेड कार्डप्रमाणेच जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून जनतेने एनडीएला आशीर्वाद दिला आहे, असे ते म्हणाले.

केंद्र व राज्यातील काँग्रेसच्या यापूर्वीच्या सरकारांनी बोडोलॅण्डमधील हिंसाचाराला पायबंध घालण्यासाठी अनेक दशके काहीच केले नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून बोडोलॅण्डमध्ये शांतता प्रस्थापित केली, असे पंतप्रधान म्हणाले.