ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटी रुपये खर्च करून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या व्यवहारातील दलाल असलेल्या दोन इटालियन नागरिकांवर इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत, सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर दलाली घेतल्याचा आरोप केला आहे. कालरे गेरोसा व गिडो राल्फ हाशके ही या दलालांची नावे असून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र रेड कॉर्नर वॉरंट काढले आहे.
सक्तवसुली संचालनालयाने हे वॉरंट काढण्याची विनंती केली होती. त्याला इंटरपोलने प्रतिसाद दिला आहे. इंटरपोलच्या मते रेड कॉर्नर नोटीस जारी असेल तर त्या व्यक्तीला संबंधित देशाच्या ताब्यात देता येते. सदर दोन व्यक्ती भारताला काळ्या पैशांच्या व्यवहार प्रकरणात हव्या असल्याचे वॉरंटमध्ये म्हटले आहे. याच प्रकरणातील ब्रिटिश आरोपी ख्रिस्तियन मिशेल जेम्स याच्या विरोधात याच महिन्यात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. सक्त वसुली संचालनालयाने त्याच्याही बाबतीत नोटीस काढण्याची विनंती केली होती. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात या सगळ्यांचा संबंध असून त्यांचे जाबजबाब घेण्यासाठी त्यांचा ताबा हवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे. या व्यवहारात ७० दशलक्ष युरोची दलाली दिली गेली. त्यात जेम्स याला व दुबईच्या ग्लोबल सव्‍‌र्हिसेस एफझेडई कंपनीला ३० दशलक्ष युरो मिळाले तर उरलेली रक्कम गेरोसा व हाशके यांना मिळाली होती.