इराणचा टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानीचा अमेरिकेने एअर स्ट्राइकमध्ये खात्मा केला. अमेरिकेच्या या कृतीविरोधात मंगळवारी नवी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. दिल्लीतील अमेरिकन दूतावासाबाहेर या मोर्चाचा शेवट होणार होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव अर्ध्यावरच हा मोर्चा रोखण्यात आला. प्रसिद्ध शिया धर्मगुरु मौलाना कलबी जावाद नक्वी आणि मेहमूद प्राचा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

या मोर्चामध्ये लाल झेंडा होता. “पूर्वी टोळया युद्धासाठी जायच्या. टोळीचा प्रमुख मारला गेल्यानंतर त्या टोळीकडून लाल झेंडा फडकवला जायचा. म्हणजे नेत्याच्या मारेकऱ्यांविरोधात ती युद्धाची घोषणा असायची. आमच्याहाती असलेल्या लाल झेंडयाचा अर्थ म्हणजे आम्ही बदला घेण्याची मागणी करत आहोत” असे एका आंदोलकाने सांगितले. तत्पूर्वी अमेरिकन दूतावासाने खबरदारी म्हणून आपल्या नागरिकांना दूतावासापासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू
इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये ३५ जण ठार झाले असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. केरमानमध्ये मंगळवारी सकाळी कासिन सुलेमानी यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. इराणी वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये कासिम सुलेमानी यांचे पार्थिव आणले होते. त्यावेळी १० लाखापेक्षा जास्त लोक जमले होते. कासिम सुलेमानी कद्स फोर्सचा प्रमुख होता. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. कासिम सुलेमानी इराणमध्ये लोकप्रिय होता. त्याच्याबद्दल सर्वसामान्य इराण जनतेमध्ये आदराची भावना होती.