दिल्ली येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्यासंख्येने रायफल्सची काडतुसे आणि काही हँड ग्रेनेड आढळून आले आहेत. ही सर्व काडतुसे आणि स्फोटकांची मुदत संपलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही स्फोटके लष्कराची असल्याचे बोलले जाते. कारण पूर्वी लाल किल्ल्यात लष्कर तैनात असत. हे काडतुसे आणि स्फोटके त्यांचेच असतील असा कयास लावला जात आहे.

सध्या लाल किल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सफाई केली जात आहे. या सफाई कामावेळीच काडतुसे आणि हँड ग्रेनेड मिळाले. ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही, अशा ठिकाणी ही स्फोटके मिळाली. ही स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती, असे प्रथमदर्शनी निर्दशनास येते. काडतुसांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे.
सुरक्षा आणि राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने लालकिल्ला अत्यंत संवेदनशील असल्याचे मानले जाते. त्यातच मोठ्याप्रमाणात काडतुसे आणि हँडग्रेनेड मिळाल्यामुळे ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक मानली जाते. २६ जानेवारीस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किल्ला परिसराची अत्यंत कसून तपासणी केल्याचा दावा केला होता. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि स्फोटके कसे लपवण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी २२ डिसेंबर २००० रोजी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. एक ४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार त्यांनी केला होता. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतरही लालकिल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळत होती. अशा परिस्थितीत लाल किल्ल्यावर मोठ्याप्रमाणात काडतुसे आणि स्फोटके मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपायुक्त जतीन नरवाल यांनी स्फोटके मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. एनएसजीचे बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एनएसजी आणि लष्कराचे अधिकारीही तपास कार्यात सहभागी झाले आहेत.