दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांच्या एका गटाने धडक दिली होती. त्यावेळी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवला होता. तेव्हा बूटा सिंह हा तिथे उपस्थित होता. तेव्हापासून तो दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या रडारवर होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ५० हजारांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. त्यानंतर जवळपास साडे पाच महिन्यांनंतर त्याला पकडण्यात यश आलं आहे.

आरोपी बूटा सिंह गेल्या साडे पाच महिन्यांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष टीम तयार केल्या होत्या. तो पंजाबचा राहणारा आहे. त्याच्यावर लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणे, तसेच प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका आहे. दीप सिद्धू आणि अन्य विरोधात दिल्ली पोलिसांनी पुरवणी चार्जशीट दाखल केली होती. त्यात दीप सिद्धूसह १६ आरोपींवर खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धूला ९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने १७ एप्रिलला दीप सिद्धूला सशर्त जामीन दिला होता. त्याचबरोबर पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच फोन नंबर न बदलण्याची ताकिदही दिली होती.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी शेतकरी आणि पोलिसात झडपही झाली होती. या हिंसाचारात ५०० पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तर, एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.