क्रिकेटपटू विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिटनेस चॅलेंज दिले असतानाच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींन आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी इंधन दरकपात करावी, असे आव्हान त्यांनी दिले असून इंधन दरकपात केली नाही, तर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिले. मोदींनीही हे आव्हान स्वीकारल्याचे म्हटले होते. यानंतर राहुल गांधी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मोदींना ‘पेट्रोल चॅलेंज’ दिले. ‘पंतप्रधानजी, तुम्ही विराट कोहलीचे आव्हान स्वीकारले याचा मला आनंदच आहे. आता मी देखील तुम्हाला एक आव्हान देतो. तुम्ही आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे. अन्यथा आम्ही देशभरात आंदोलन करु आणि तुम्हा दरकपात करण्यास भाग पाडू’, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी केले.

दोन दिवसांपूर्वी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्व पटवून देण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘फिटनेस चॅलेंज’ हे ट्रेंडमध्ये आहे.