अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावरील चित्रपट

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

सुशांतसिंह राजपूत याचे वडील कृष्णकिशोर सिंह यांनी याबाबत केलेली याचिका न्या. संजीव नरुला यांनी फेटाळली आहे. आपल्या मुलाच्या नावाचा वापर कोणालाही करू दिला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती.

या चित्रपटामध्ये सुशांतसिंहच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे, त्यामध्ये त्याचे नाव, कारकीर्द आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे, त्यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही परवानगीविना सुशांतच्या आयुष्याशी निगडित चित्रपट तयार करणे अथवा पुस्तक प्रकाशित करणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, यासाठी कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही सुशांतच्या वडिलांचे म्हणणे आहे.

ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिग्दर्शक दिलीप आणि निर्मात्या सरला सराओगी यांना सुनावणीपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.