प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या क्रौर्याचा बळी ठरलेले शहीद जवान सुधाकर सिंग आणि हेमराज सिंग या दोघांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केली होती, हा पाकिस्तानचा आरोप लष्करप्रमुख जन. बिक्रम सिंग यांनी बुधवारी फेटाळला. शहीद हेमराजच्या आप्तांच्या भेटीनंतर ते बोलत होते.
आमच्या जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आम्ही प्रथम गोळीबारही केलेला नाही. त्यांच्याकडून जोरदार मारा सुरू झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केवळ आम्हीही मारा केला. त्यात त्यांच्या बाजूने जीवितहानी झाली असेलही, असे जन. सिंग म्हणाले. शहीद हेमराजच्या कुटुंबाला लष्करी नियमांनुसार सर्वतोपरी साह्य़ केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. देशासाठी वीरमरण आलेल्या प्रत्येक शहीदाच्या आप्तांची भेट घेण्याची आपली इच्छा आहे आणि प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. अर्थात देशात दहा हजारांहून अधिक वीरपत्नी आहेत आणि त्या सर्वाना माझ्या पत्नीसह भेटणे अशक्य असले तरी आम्हा दोघांची तशी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शहीद जवान सुधाकर सिंग यांच्या आप्तांच्या सांत्वनभेटीसाठी लष्करप्रमुख जन. बिक्रम सिंग आणि संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे शुक्रवारी मध्य प्रदेशातील सिधि जिल्ह्य़ातील दाढिया या त्याच्या जन्मगावी जाणार आहेत. लष्करप्रमुख आणि मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी लष्कराचे पथक दाढिया गावी दाखल झाले आहे.