पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारितक नागरिकत्व कायद्याबाबत पुन्हा एकदा सरकारची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या कायद्याबाबत मोठा दबाव असतानाही आम्ही याबाबत ठाम राहिलो आणि पुढेही राहणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत याबाबत आम्ही माघार घेणार नाही, असे यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी देखील स्पष्ट केले आहे. पंतप्रधान चांदौली येथे बोलत होते. या ठिकाणी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, अनेक वर्षांपासून भारत कलम ३७० आणि सीएए सारख्या निर्णयांच्या प्रतिक्षेत होता. देशाच्या हितासाठी हे निर्णय घेणे गरजेचे होते. या निर्णयांबाबत मोठा दबाव असतानाही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो आणि यापुढेही राहू.

५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा महत्वाचा

आज जेव्हा आपण भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेबाबत बोलतो तेव्हा पर्यटन यामागचा मुख्य भाग असतो. अर्थव्यवस्थेचं हे ध्येय गाठण्यासाठी देशातील निसर्ग, वारसा याबाबतचे पर्यटन सक्षम भुमिका बजावू शकते. त्यामुळेच वाराणसीसह इतर पवित्रस्थळांचा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकास करण्यात येणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

या ठिकाणी उभारण्यात आलेले दीनदयाळ उपाध्याय यांचे स्मारक आणि भव्य पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हे स्मारक आणि पुतळा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे मोदी यावेळी म्हणाले.