जगात इतर देशांमध्ये वृत्तपत्रांची संख्या व खप कमी होत असताना भारतात मात्र इंग्रजी व भाषिक (प्रादेशिक) वृत्तपत्रांची संख्या व खप वाढत आहे. भारतात एकूण नोंदणीकृत वृत्तपत्रांची संख्या मार्च २०१३ ते मार्च २०१५ दरम्यान १०५४४३ झाली आहे. हिंदी, इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रे सोडून भाषिक वृत्तपत्रांचा दिवसाचा एकूण खप २०१३-१४ मध्ये १२५११९६४८ झाला आहे तो २०११-१२ मध्ये १०,८६०३८११ होता. इंग्रजी वृत्तपत्रांच्या खपात अलीकडे वाढ झाली असली तरी खपात चढउतार दिसत आहेत.
रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया म्हणजे आरएनआय या संस्थेने जी माहिती दिली आहे त्यानुसार प्रत्येक राज्यात वृत्तपत्रांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेशात ३१ मार्च २०१३ अखेर १४३३६ वृत्तपत्रे होती ती वर्षभरात १५२०९ झाली व आता १६१३० आहे.
आंध्रात २०१३ मध्ये ५५७५ प्रकाशने होती ती आता ६२१५ झाली असून तेलंगणात आणखी २०३ वृत्तपत्रांची नोंद झाली आहे. लक्षद्वीप व नागालँड येथे प्रकाशनांच्या संख्येत फरक झालेला नाही. त्यांची संख्या अनुक्रमे ७ व २२ आहे. भाषिक वृत्तपत्रात २०१४ मध्ये इंग्रजीत १३१३८ वृत्तपत्रे होती ती एक वर्षांत १३६६१ झाली. हिंदूी प्रकाशनांची संख्या ४०१५९ होती ती आता ४२४९३ झाली आहे. मार्च २०१४ मध्ये संस्कृतमध्ये ८० प्रकाशने होती ती आता ९५ झाली आहेत. वृत्तपत्रांची संख्या वाढत असून त्यांचा खपही वाढत आहे. आरएनआयने दिलेल्या माहितीनुसार हिंदी, इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रे सोडून भाषिक वृत्तपत्रांचा खप २०११-१२ मध्ये १०८६०३८११ होता तो २०१३-१४ मध्ये १२५११९६४८ झाला आहे. इंग्रजी वृत्तपत्रात खपाचे आकडे बदलते आहेत २०११-१२ मध्ये इंग्रजी वृत्तपत्रांचा खप दिवसाला ६८०७७२२८० होता तो २०१२-१३ मध्ये ५६३८५९९८ झाला तर २०१३-१४ मध्ये वाढून पुन्हा ६४४०५६४३ प्रती इतका खप दिवसाला होता.

महाराष्ट्रात वृत्तपत्र संख्येत वाढ
महाराष्ट्रात वृत्तपत्रांची संख्या मार्च २०१३ मध्ये १२४६६ होती ती एक वर्षांत १३३७५ झाली व मार्च २०१५ मध्ये १४३९४ झाली. दिल्लीत २०१३ मध्ये ११४१० वृत्तपत्रे होती ती मार्च २०१५ मध्ये १२१७७ झाली.