देशात मार्चच्या टाळेबंदीनंतर रेल्वेसेवा काही प्रमाणात पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर एकूण ८० हजार प्रवाशांनी तिकिटाची नोंदणी केली असून त्यात रेल्वेला १६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

मंगळवारी पहिली गाडी नवी दिल्ली स्टेशनवरून मध्यप्रदेशातील बिलासपुरला रवाना झाली. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपासून तिकिटाची नोंदणी सुरू करण्यात आली होती. पुढील सात दिवस चालवण्यात येणाऱ्या या विशेष गाडय़ांचे ४५ ५५३ (पीएनआर-पॅसेंजर नेम रेकॉर्ड) इतके  बुकिंग झाले असून त्यातून १६ .१५ कोटी रुपये मिळाले आहेत. या बुकिंग च्या माध्यमातून ८२ ३१७ प्रवासी रेल्वेने प्रवास करणार आहेत.

रेल्वेने करोनाचा  प्रसार टाळण्यासाठी नवीन नियम प्रवाशांसाठी जाहीर केले असून यापुढे प्रवाशांना ९० मिनिटे आधीच रेल्वेस्थानकावर यावे लागणार आहे, याशिवाय त्यांची स्थानकावर आल्यानंतर त्यांची थर्मल स्कॅनर  तपासणी केली जाणार असून लक्षणे नसतील तरच गाडीत बसू दिले जाणार आहे, तोंडाला मुखपट्टी बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यापुढे प्रवाशांना अन्न व पाणी घरूनच आणावे लागेल. जर अन्न व पाणी रेल्वेकडून घ्यायचे असेल तर त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. यापुढे तिकिटांसाठी प्रतीक्षायादी असणार नाही.

सात दिवस आधी तिकिटांचे बुकिंग करता येणार असून रेल्वतील तिकीट तपासनिसाकडून कुणालाही तिकीट दिले जाणार नाही. रेल्वेने मंग़ळवारी पंधरा गाडय़ा सुरू केल्या असून प्रवाशांना आरोग्य सेतू उपयोजन सक्तीचे करण्यात आले आहे. मंगळवारपासून ज्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या त्या राजधानी प्रवर्गातील असून त्यात केवळ वातानुकूलित डब्यांची व्यवस्था तीनही वर्गासाठी आहे.