केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनता परिवारातील घटक पक्ष सोमवारी नवी दिल्लीत निदर्शने करणार आहेत. त्या पक्षांच्या विलीनीकरण्याच्या दृष्टीने या आंदोलनाला महत्त्व आहे.
लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल तसेच संयुक्त जनता दल यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया या आंदोलनानंतर सुरू होईल असे सूत्रांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत असून भाजपला रोखण्यासाठी हे विलीनीकरण गरजेचे असल्याचे मत संयुक्त जनता दलाच्या नेत्याने व्यक्त केले. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसबरोबर या पक्षांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत  यश मिळवले होते.
गेल्या महिन्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीला लोकदल, धर्मनिरपेक्ष जनता दल तसेच एसजेपीचे प्रतिनिधी हजर होते.