पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची घटस्फोटीत पत्नी रेहम खान सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रेहम खान या इम्रान यांच्यावर खोटे आरोप लावल्याचे सांगत माफी मागताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आता रेहम खान यांनी स्वत: ट्विटरवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानमधील युट्यूबर वकार झाका याने रेहम यांची मुलाखत घेतली होती. रेहम यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये इम्रान खान यांच्यावर अंमली पदार्थांचे सेवन करणे, छळ करणे आणि लैंगिक वर्तवणुकीबद्दल आरोप केले होते. याच पुस्तकामध्ये रेहम यांनी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध आणि खासगी आयुष्यातील अन्य काही गोष्टी उघड केल्या होत्या. यावरुनच झाकाने रेहम यांना मुलाखतीमध्ये काही प्रश्न विचारले. यावेळेस उत्तर देताना रेहम यांनी इम्रान यांची तुलना त्यांच्या आधीच्या पतीशी केली. याच मुलाखतीमधील काही भाग व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता इम्रान खान यांच्या पाकिस्तानातील सत्तारूढ पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या समर्थकांनी रेहम खान यांनी पंतप्रधानांवर खोटे आरोप लावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी रेहम यांनी इम्रान यांची माफी मागावी असं इम्रान यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. ‘एक्सप्रेस ट्रेब्यून’मधील वृत्तानुसार रेहम यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले आहे.

त्या व्हिडिओत बरेच कट

‘एक्सप्रेस ट्रेब्यून’मधील वृत्तानुसार व्हायरल होणारा व्हिडिओ अनेक जागी एडीट करण्यात आला आहे. मुलाखत घेणारा झाका जेव्हा प्रश्न विचारतो त्यानंतर लगेच व्हिडिओ कट होतो आणि मग रेहम उत्तर देण्यास सुरुवात करतात असं दिसून येत असल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. तुम्ही इम्रान खान यांची माफी मागणार का असा सवाल विचारल्यानंतर व्हिडिओ कट होतो आणि मग रेहम या उत्तर देऊ लागतात असं स्पष्टपणे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काही ठिकाणी रेहम यांचा आवाजही येत नाही.

वाचा >> भारतातही इम्रान खानची अनौरस मुलं : रेहम खान

रेहम यांचे ट्विट

मुलाखतीच्या शेवटी रेहम आता मला जावं लागेल धन्यवाद असं म्हणून निघून जाताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथील सोशल मिडियावर ट्रेण्ड झाला. त्यावरुनच रेहम यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर रेहम यांनी ट्विटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. झाकाने या संपूर्ण मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचे रेहम यांनी म्हटलं आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या दबावामुळे झाकाने हे कृत्य केल्याचेही रेहम यांनी म्हटलं आहे. मी इम्रान खान यांच्याबद्दलच्या माझ्या पुस्तकात काहीच चुकीचे लिहिलेलं नाही असंही रेहम यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटवरुन प्रतिक्रिया देताना रेहम यांनी “हा छेडछाड केलेला व्हिडिओ आहे. हा बिचारा रेटींगसाठी जोर लावत आहे,” असं मत व्यक्त करत हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटलं आहे.

रेहम आणि इम्रान खान यांचे लग्न अवघं एक वर्ष टीकलं. २०१४ साली या दोघांनी लग्न केलं आणि २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर रेहम यांनी लिहिलेल्या इम्रान खान यांच्या आयुष्यावरील पुस्तकामध्ये अनेक खुलासे त्यांनी केले होते.