उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यामध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय बहादूर सिंग यांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी आदेश दिले. चौकशीदरम्यान सिद्धार्थनगर येथील प्रेमनाथ मिश्रा यांनी २५ मे रोजी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि २८ मे रोजी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. “करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह स्मशानभूमीवर नेऊन अंत्यस्कार करणं अपेक्षित होते. मात्र समोर आलेल्या व्हिडीओनुसार प्रेमनाथ यांच्या नातेवाईकांनी मृतदेह नदीत फेकून दिल्याचं दिसत आहे,” असं विजय यांनी सांगितलं आहे. विजय यांचा हा व्हिडीओ बलरामपूर पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओ मृतदेह नदीत फेकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ नदीवरील पुलावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने गाडीमधून शूट केला आहे. या व्हिडीओत पावासामध्ये दोन जण मृतदेह नदीवरील पुलाच्या कठड्यावरुन खाली पाण्यात फेकून देताना दिसत आहे. यापैकी एका व्यक्तीने पीपीई कीट घातल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ ४५ सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये साध्या कपड्यांमधील व्यक्ती ही मृताचा नेतेवाईक असल्याचे समजते.

हिंदुस्तान या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये संजय शुक्ला नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या रुग्णालयात प्रेमनाथ मिश्रा यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं त्या रुग्णालयाचे नोडल ऑफिसर असणाऱ्या डॉ. ए.पी. मिश्रा यांनी प्रेमनाथ यांचा मृतदेह संजय शुक्ला यांच्या ताब्यात देण्यात आल्याची कबुली दिलीय. शनिवारी दुपारी प्रेमनाथ यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला. रापती नदीच्या काठी असणाऱ्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन जायला रुग्णवाहिकेची सोयही करण्यात आली होती.

मे महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत शेकडो मृतदेह तरंगताना आढळून आले होते. तसेच नदीच्या काठांवर वाळूमध्ये गाडलेले हजारो मृतदेह बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये दिसून आलेले. यापैकी अनेकांचा मृत्यू करोनाने झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. पैसे नसल्याने या मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह नदीकाठी पुरले किंवा नदीत वाहून दिले असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या मृतदेहांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर देशातील प्रसारमाध्यमांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनीही त्यांची दखल घेतली होती.