चीनमधील करोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र असलेल्या वुहान येथून भारतात परत आणलेल्या  ४०६ लोकांना इंडो—तिबेट सीमा पोलीस दलाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून चाचण्यात त्यांना विषाणूची लागण नसल्याचे दिसून आल्याने त्यांची सोमवारी सुटका करण्यात येणार आहे.

विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्व लोकांचे नमुने शुक्रवारी डॉक्टरांनी घेतले असून त्याचे निकाल रविवारी हाती आले आहेत. नमुना तपासणीत जर त्यांना विषाणूचा संसर्ग दिसून आला नाही तर त्यांना सोडून देण्यात येईल असे सांगण्यात आले होते त्याप्रमाणे सोमवारी त्यांना सोडण्यात येणार आहे.  अर्थात त्या आधी आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणार आहे. इंडो तिबेट पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी विवेककुमार पांडे यांनी सांगितले की, त्यांना सोडून देण्याआधी इतरही काही वैद्यकीय प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्याने त्यांना सोडून देण्यात येणार आहे.

एकूण ६५० भारतीयांना १ व २ फेब्रुवारी रोजी वुहान येथून मायदेशी आणले होते. त्यासाठी एअर इंडियाच्या दोन खास विमानांची सेवा घेण्यात आली होती.

चीनमध्ये जुन्या नोटा, नाण्यांचे निर्जंतुकीकरण

बीजिंग : चिनी संशोधकांनी करोना विषाणूवर उपचारासाठी क्लोरोक्विन फॉस्फेट, फॅविपीरावीर, रेमडेसीवीर या औषधांवर लक्ष केंद्रित केले आहे. जुन्या चलनी नोटा व नाणी बाजूला ठेवून त्यांचे अतिनील किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जात आहे.

जपानी जहाजावर आणखी दोन भारतीयांना लागण

जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर आणखी दोन भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला असून भारतीय दूतावासाने जहाजावरील भारतीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. चाचण्या नकारात्मक आलेल्या लोकांनाच भारतात नियमानुसार परत नेता येईल असे दूतावासाने म्हटले आहे. जहाजावर एकूण १३८ भारतीय असून त्यात १३२ कर्मचारी व ६ प्रवासी आहेत. जहाजावर करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता ३५५ झाली असून अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग या देशाच्या नागरिकांना परत नेण्याची व्यवस्था संबंधित देश करणार आहेत.