गेल्या 14 महिन्यांमध्ये रिलायंस समुहाने 35 हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडले असल्याची माहिती रिलायंस समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी दिली. कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या कालावधीत 24 हजार 800 कोटी रूपयांचे मुद्दल आणि 10 हजार 600 कोटी रूपयांचे व्याज आपण फेडले आहे. आव्हानात्मक काळात कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय हे कर्ज आपण फेडल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीविषयी पसरवण्यात आलेल्या अफवा, तर्क आणि रिलायंस समुहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली घट यामुळे सर्वच स्टेकहोल्डर्सना मोठे नुकसान झाल्याचे अंबानी यांनी सांगितले. येत्या काळात कंपनीवर असलेले कर्ज नियोजित वेळेत भरणार करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी गुंतवणुकदारांना दिले. सध्या अनिल अंबानी यांच्या रिलायंस कॅपिटल, रिलायंस पावर आणि रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांशी निगडीत कंपन्यांवर 35 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे.

दरम्यान, अंबानी यांनी समुहावरील समस्यांसाठी नियामक संस्था आणि न्यायालय जबाबदार आहेत. तसेच अनेक प्रकरणांमध्ये विलंबाने निर्णय झाल्यामुळे 30 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक प्रणालीने अनिल धीरूभाई अंबानी समुहाप्रती उदासिनता दाखवली असल्याने कोणतीही त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळेच कर्जदारांच्या आणि स्टेकहोल्डर्सच्या हितांचे नुकसान झाले, असल्याचे अंबानी म्हणाले.