रिलायन्स जिओकडून स्पर्धक कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिलायन्स जिओकडून दूरसंचार नियामक मंडळाला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं आहे. व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल चुकीचा मार्ग स्वीकारत असून नव्या कृषी कायद्यांमुळे जिओचा फायदा होत असल्याची खोटी अफवा पसरवत असल्याचा आरोप रिलायन्स जिओकडून करण्यात आला आहे.

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चा निष्पळ ठरल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम असून कृषी कायदे रद्द व्हावेत ही मागणी धरुन लावली आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावरुन नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले…

दरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पाठवलेल्या पत्रात जिओने स्पर्धक कंपन्याकडून वेगवेगळ्या मोहीम चालवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. ११ डिसेंबर रोजी रिलायन्स जिओकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे. “मोठ्या प्रमाणात ग्राहक नंबर पोर्ट करण्याची मागणी करत असून हे एकमेव कारण देत आहेत. त्यांची सेवेशी संबंधित किंवा इतर कोणतीही तक्रार नाही”.

आणखी वाचा- “शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलंय”

जिओकडून याआधी २८ सप्टेंबरलाही अशाच पद्धतीचं एक पत्र लिहिण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अनैतिक पद्धतीने मोहिम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा उल्लेखही या पत्रात आहे.

जिओने केलेल्या आरोपांना एअरटेलने उत्तर दिलं असून हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. “आमचे काही स्पर्धक निराधार आरोप करत असून डावपेच आखत आणि वर्तनातून आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही अभिमान वाटेल अशा पद्दतीने आणि पारदर्शकपणे व्यवसाय करत आहोत, ज्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं एअरटेलने निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं आहे. व्होडोफोन आयडियानेही जिओचे आरोप फेटाळले असून नैतिकतेच्या आधारे आम्ही व्यवसाय करत असल्याचं म्हटलं आहे.