आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानी आता रिलायन्स कॅपिटल कंपनीतील आपला हिस्सा विकणार आहेत. त्यांनी रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट लि. मधील (आरनाम) आपला पूर्ण हिस्सा विकण्यासाठी निप्पॉन लाइफ इन्शुरन्सकडून प्रस्ताव मागवला आहे. आरनाममध्ये जपानची निप्पॉन लाइफ इन्शुरन्सचा ४२.८८ टक्के तर रिलायन्स कॅपिटलचा ४२.९ टक्के हिस्सा आहे.
या वृत्तानंतर रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आणि शेअर १५६ रूपयांवर पोहोचला. कंपनी व्यवस्थापनाने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना याबाबत सांगितले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. हा भार कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या समूहातील काही भाग विकण्यास काढला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमवर थकबाकी संबंधी एका प्रकरणात अनिल अंबानी आणि इतर दोघांना न्यायालयाचा आदेश न मानल्यामुळे फटकारले होते.
सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमला एरिक्सनची ५५० कोटी रूपयांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले होते. चार आठवड्याच्या आत एरिक्सनची थकबाकी जमा केली नाही तर त्यांना तीन महिन्याचा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 3:04 pm