मोदी सरकारकडून गेल्या तीन वर्षांच्या काळात देशाचा विकास झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी सध्या औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच आयडिया सेल्युलर या कंपनीचे प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांच्या मानधनात मोठी कपात करण्यात आली होती. कंपनीने त्यांचे मानधन १३ कोटींवरून थेट तीन लाखांपर्यंत खाली आणले होते. ‘रिलायन्स जिओ’च्या प्रवेशाने दूरसंचार क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे कंपनीला मोठा तोटा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुकेश अंबांनी यांच्या जिओमुळे तोटा सहन करावा लागणाऱ्यांमध्ये कुमार मंगलम बिर्ला काही एकटेच नाहीत. आता या यादीत मुकेश अंबांनी यांचे धाकटे बंधू आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबांनी यांचाही समावेश झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सची कामगिरी सातत्याने घसरते आहे. या घसरणीमुळे अनेक पतमानांकन संस्थांनी कंपनी कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे आता अनिल अंबांनी यांनी वर्षभर कंपनीकडून वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर कंपनीच्या व्यवस्थापनानेही २१ दिवसांचा वैयक्तिक पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सला तब्बल ९६६ कोटींचा तोटा झाला होता. तर कंपनीच्या डोक्यावरील कर्जाची रक्कम ४२ हजार कोटींच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे कंपनीने डिसेंबरपर्यंत ६० टक्के कर्ज कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या मोफत खैरातींमुळे अनेक कंपन्यांचे ग्रह फिरल्याचे चित्र आहे. जिओच्या ऑफर्समुळे आयडिया, व्होडाफोन, भारती एअरटेल या कंपन्यांना आपल्या सेवांचे दर नाईलाजाने खाली आणावे लागले आहेत.

विप्रोचे संचालक अजीम प्रेमजी यांच्या वार्षिक मानधनातही यंदा ६३ टक्के कपात करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचं कमिशन न मिळाल्यानं त्यांच्या मानधनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रेमजी यांचं वार्षिक मानधन यावर्षी १ लाख २१ हजार ८५३ डॉलर अर्थात भारतीय रूपयांप्रमाणे सुमारे ७९ लाख रूपये इतके होते. मागच्या आर्थिक वर्षात प्रेमजी यांचं मानधन ३ लाख २७ हजार ९९३ डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे २ कोटी १७ लाख रूपये होते. अमेरिकेतल्या विनिमय आयोगानं दिलेल्या माहितीनुसार प्रेमजी यांना २०१६-१७ या वर्षात ६६ हजार ४६४ डॉलर मानधन, ४१ हजार ७४२ रूपये भत्ता आणि १३ हजार६४७ डॉलरचं दीर्घकालीन पॅकेज मिळालं होतं. मात्र ३१ मार्च २०१७ ला जो आर्थिक आढावा घेण्यात आला त्यात प्रेमजी यांचं कमिशन शून्य टक्के होतं. त्यामुळे त्यांच्या मानधनात थोडी थोडकी नाही तर ६३ टक्के घट झाली. गेल्या काही वर्षांपासून IT सेक्टरच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या पगारात घट झाल्याची बातम्याच समोर येत आहेत. इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांच्या मानधनातही ६७ टक्के कपात झाली आहे. त्यांना मानधनाच्या रूपात ४८ कोटी ७३ लाख रूपये मिळणार होते.. मात्र त्यांना फक्त १६ कोटी १ लाख रूपयेच मानधन म्हणून मिळाले. २०१५-१६ या वर्षात प्रेमजी यांना १ लाख ३९ हजार ६३४ डॉलर कमिशनच्या रूपानं मिळाले होते. मात्र मागचं आर्थिक वर्ष हे प्रेमजी यांच्यासाठी तोटा करणारं ठरलं. आयटी सेक्टरनं एकेकाळी पगारात आणलेली मोठी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसते आहे.