उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शनिवारी ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय २४,७१३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात अधिग्रहित केला. त्यामुळे रिलायन्सचा किराणा क्षेत्रातील विस्तार आणखी मजबूत होणार आहे. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या ई-व्यापार कंपनीचा तुल्यबळ स्पर्धक म्हणून रिलायन्सने हे पाऊल टाकले आहे.

‘रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लि.’ या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीमार्फत हा अधिग्रहण व्यवहार करण्यात आला. या व्यवहारामुळे बिग बझार, एफबीबी, इझीडे, सेंट्रल, फुडहॉल या किराणा नाममुद्रांसह ४२० शहरांतील त्यांच्या १८०० विक्री दालनांवर रिलायन्सचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.

‘फ्यूचर’ समूहाचा लॉजिस्टिक (रसद पुरवठा) व्यवसाय आणि गोदाम व्यवसायही रिलायन्स ताब्यात घेणार आहे. छोटे व्यापारी आणि किराणा दुकानदार त्याचबरोबर मोठय़ा ब्रँडना बरोबर घेण्याचे आमचे धोरण असून ग्राहकांनी मोजलेल्या पैशाचे त्यांना वस्तूंच्या रूपात पुरेपूर मूल्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे रिलायन्स रिटेलच्या संचालक इशा अंबानी यांनी सांगितले.