करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउन दरम्यान अनेक उद्योगधंदे बंद आहेत. परंतु काही सेवांना या लॉकडाउनमधून वगळण्यात आलं आहे. अशा कठीण परिस्थितीतही सेवा पुरवणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आभार मानले आहे. तुम्ही सर्व फ्रन्टलाईन वॉरिअर्स आहात असं म्हणत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायन्स समुहाचा व्यवसाय पेट्रोलिअम पदार्थांपासून दूरसंचार सेवांपर्यंत विस्तारलेला आहे. त्यामुळे कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी ईमेलद्वारे आभार मानले आहेत.

करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक जण आपल्या घरातच बसून आहेत. रिलायन्स जिओ ही कंपनी जवळपास ४० कोटी लोकांना आपली दूरसंचार सेवा पुरवत आहे. याव्यतिरिक्त रिलायन्स रिटेलकडून जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही सुरू आहे. तर दुसरीकडे रिलायन्स लाईफ सायन्स करोनाविरुद्धच्या लढ्यात संशोधनाची मदत करत आहे. तर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटललनं करोनाच्या रूग्णांसाठी १०० बेड तयार ठेवले आहेत. याव्यतिरिक्त कपंनीचं इंधन आणि पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादनही सुरू आहे.

करोनावर विजय मिळवणारच
मुकेश अंबानी यांनी ४ एप्रिल रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. यामध्ये त्यांनी कोविड-१९ ची चाचणी आणि त्यावरील उपचाराबाबत माहिती दिली होती. “माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला फ्रन्टलाईन वॉरिअर म्हणून सन्मानित केलं पाहिजे. कंपनी आणि देशाप्रती तुम्ही जे करत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जोपर्यंतर करोना व्हायरसवर आपण विजय मिळवत नाही तोवर आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.