रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ने (आरआयएल) रविवारी भगवान वेंकेटेश्वर देवस्थानला १.११ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. देवस्थानमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर आजाराशी सामना करत असलेल्या गरीब व्यक्तींसाठी तिरूमला तिरूपती देवस्थानकडून (टीटीडी) एक रूग्णालय चालवले जाते. त्यासाठी एक ट्रस्ट बनवण्यात आले असून त्याला ही रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे प्रतिनिधीत्व करणारे कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद यांनी टीटीडीच्या संयुक्त कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या रकमेचा डिमांड ड्राफ्ट सोपवला. या रकमेचा उपयोग देवस्थानच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सुपर स्पेशलिटी रूग्णालयात मोफत उपचाराची सुविधा प्रदान करण्यासाठी केला जाईल. रिलायन्सने सप्टेंबरमध्ये या कारणासाठीच १.११ कोटी रूपयांचे दान दिले होते.

दरम्यान, देशात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. एका संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१८ दरम्यान आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती अंबानी यांनी एका वर्षांत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात ४३७ कोटी रुपये खर्च केले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पिरामल समूहाचे अजय पिरामल हे आहेत. त्यांनी २०० कोटी रूपये दान केले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर विप्रोचे अझीम प्रेमजी आहेत. त्यांनी ११३ कोटी रूपये दान केले आहेत. चौथ्या क्रमांकावर गोदरेज समूहाचे आदि गोदरेज आहेत. त्यांनी ९६ कोटी रूपये दान केले आहेत तर पाचव्या क्रमांकावर लूलू समूहाचे युसूफ अली एम ए आहेत. त्यांनी एका वर्षांत ७० कोटी रूपये दान केले आहेत.