रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शनिवारी बद्रीनाथ आणि केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बद्रीनाथ मंदिरात चंदन आणि केदारनाथ मंदिरात पूजा-सामग्रीसाठी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान दिले. त्यांनी बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर समितीकडे ही राशी सुपूर्द केली.

मुंकेश अंबानी हे सकाळी नऊ वाजता बद्रीनाथमध्ये पोहोचले. यावेळी मंदिर समितीचे मुख्य कार्याधिकारी बी.डी.सिंह आणि भुवनचंद्र उनियाल यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुकेश अंबानी यांनी गीता पठणात सहभाग घेऊन देशवासींयांसाठी प्रार्थना केली. यादरम्यान त्यांनी दोन कोटी रूपयांचे दान केले. या माध्यमातून बद्रीनाथ मंदिरात चंदन आणि केदारनाथ मंदिरात पूजा सामग्री खरेदी करण्यात येणार आहे.

मंदिरात वापरण्यात येणारे हे चंदन मुकेश अंबानी यांचे वडिल आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या नावे खरेदी केले जाणार आहे. दरम्यान, मंदिरांमध्ये पूजेसाठी वापरण्यात येणारे चंदन हे तामिळनाडूतील जंगलांमधून खरेदी करण्यात यावे, अशी विनंती अंबानी यांनी मंदिर समितीला केली.

मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानीच्या लग्नापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले होते. तसेच यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बद्रीनाथाचे आणि केदारनाथाचे दर्शन घेतले होते.