रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सरकारला भारत 2G मुक्त करण्यासाठी त्वरित धोरणात्मक पावलं उचलण्याची विनंती केली आहे. “२५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 2G सेवेतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्या सेवांना आता इतिहासाचा एक भाग बनण्याची गरज आहे,” असं ते शुक्रवारी बोलताना म्हणाले. “सध्या देशात ३० कोटी ग्राहत 2G सेवांच्या फिचर फोनचा वापर करत आहेत. ते इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. जेव्हा आपण 5G च्या जगात प्रवेश करणार आहोत, अशा वेळी ते जुन्या सेवांचा लाभ घेत असल्याचंही अंबानी म्हणाले. भारतातील पहिल्या मोबाइल फोन कॉलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ते बोलत होते.

“सद्यस्थितीत ३० कोटींपेक्षा अधिक ग्राहक हे 2G सेवांमध्येच अडकले आहेत. तसंच त्यांच्या फिचर फोनमुळे त्यांना इंटरनेट
सेवांचा लाभही घेता येत नाही. आपण 5G च्या जगतात प्रवेश करणार आहोत. अशा वेळी 2G सेवांना इतिहास बनवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी भारत 2G सेवांपासून मुक्त करणार असल्याची घोषणा अंबानी यांनी केली होती. तसंच ग्राहकांना चांगल्या सेवांचा लाभ घेता यावा यासाठी स्वस्त दरातील फोनही बाजारात उतरवणार असल्याचं ते म्हणाले होते.

लवकरच 5G ची चाचणी

यापूर्वी रिलायन्स जिओच्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी 5G सेवा पुढील वर्षापासून सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला देत जिओ याच दिशेने वाटचाल करत असल्याचे आणि संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचंही यावेळी नमूद केलं होतं. जिओचं तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलेलं असून १०० टक्के भारतीय आहे. जिओ आता शून्य कर्ज असलेली कंपनी असल्याचे सांगताना जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल करत असलेल्या ३३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा दाखलाही त्यांनी दिला होता.