रिलायन्स जिओ जेव्हापासून बाजारात आले आहे तेव्हापासून आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलच्या ग्राहकांमध्ये घसरण होत आहे. जिओने लाँच झाल्यापासून मोफत सेवा दिली आहे. मोफत ४ जी डेटा आणि अमर्यादित टॉक टाइम यामुळे जिओची सेवा लोकप्रिय झाली. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या फायद्यामध्ये आणि ग्राहकांमध्ये घट झाली. जिओ सारखी मोफत सेवा देणे आम्हाला परवडणार नाही असे म्हणत एअरटेलनी जिओविरोधात ट्रायमध्ये धाव घेतली.

या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नसताना जिओने देखील एअरटेल, व्होडाफोन, आयडियाविरोधात ट्रायकडे धाव घेतली आहे.  जिओला नवे ग्राहक मिळू नयेत यासाठी या कंपन्यांनी षडयंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे. संपूर्ण देशभरात पोर्टेबिलिटी चालते. म्हणजे जर तुम्ही एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची सेवा घेणार आहात तर तशी सुविधा उपलब्ध आहे. परंतु जे ग्राहक त्यांचे नेटवर्क सोडून जिओचे नेटवर्क घेऊ इच्छितात त्यांना ही सेवा उपलब्ध करुन दिली जात नसल्याचे रिलायन्सने आपल्या तक्रारीमध्ये म्हटल आहे. जर एखाद्या ग्राहकाने पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केला तर त्याला रिलायन्स जिओबद्दल वाईट सांगितले जाते. तसेच त्यांची नेटवर्कची समस्या आहे असे देखील सांगितले जाते. असे रिलायन्सने म्हटले आहे.

रिलायन्सचे हे सर्व दावे टेलिकॉम कंपन्यांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही सर्व ग्राहकांना समान सेवा देतो असे व्होडाफोनच्या प्रवक्त्यांनी म्हटले. जास्तीत जास्त ग्राहकांना संवादाचे साधन उपलब्ध असावे आणि त्यांना योग्य सेवा मिळावी हा आमचा उद्देश आहे तेव्हा रिलायन्सने केलेले आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. उलट रिलायन्समुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा नष्ट झाली असल्याचे ते म्हणाले.