काही महिन्यांपूर्वीच भारतात उपलब्ध झालेली रिलायन्सची जिओ ४ जी सेवा ही देशातील सर्वोत्तम ४ जी सेवा ठरल्याचे ट्रायच्या डाटावरुन लक्षात येत आहे. जिओ ४ जीने एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या सेवांना मागे टाकत ४ जी सेवेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिओ ४ जी सेवेचा काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानींच्या हस्ते शुभारंभ झाला होता. रिलायन्सने आपली जिओ ४ जी सेवा पूर्णपणे मोफत दिली त्याबरोबरच रिलायन्सने आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मोफत दिली.

तेव्हापासून आतापर्यंत जिओ ४ जी सेवेने बाजारपेठ व्यापून टाकली आहे. डिसेंबर २०१६ च्या सर्वात चांगल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या यादीत जिओ प्रथम आहे. ट्रायच्या मायस्पीड पोर्टलनुसार डिसेंबर २०१६ साठी जिओने एअरटेल, व्होडाफोन आणि इतर कंपन्यांना मागे टाकले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जिओची ऑक्टोबर महिन्यातील स्पीड अगदी कमी होती. गेल्या दोन महिन्यात जिओने चांगली प्रगती केली आहे.

पूर्ण देशभरात कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा कसा स्पीड आहे हे जर तपासायचे असेल तर ट्रायच्या वेबसाइटवर ४ जी सर्व्हिस प्रोव्हायडर हा पर्याय निवडावा आणि इतर नेटवर्कशी तुलना करावी.  जिओचा डाऊनलोड स्पीड ९.९ एमबीपीएस आहे, एअरटेलचा ५.८ एमबीपीएस, व्होडाफोनचा ४.८ एमबीपीएस स्पीड आहे. या तुलनेत टेलिनॉर हे पाठीमागे असल्याचे दिसून येते. टेलिनॉरची स्पीड २.८ एमबीपीएस आहे. एअरसेलची स्पीड ०.९३ एमबीपीएस आहे.

काय आहे मायस्पीड पोर्टल?

टेलिफोन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने एक (myspeed.trai.gov.in) हे पोर्टल तयार केले आहे. तुमच्या भागात अथवा शहरात कोणता सर्व्हिस प्रोव्हायडर कशी सुविधा देत आहे हे जर तपासून पाहावयाचे असेल तर ही वेबसाइट तुमची मदत करू शकेल. तुम्हाला कोणती सुविधा, कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून कुठल्या भागात कशी सुरू आहे याची सर्व माहिती या पोर्टलवर क्षणार्धात मिळते. इतकेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या वर्गवारीमध्ये पहिल्या तीन क्रमांकाचे सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहेत याची माहिती देखील तुम्हाला येथे मिळू शकते. सिग्नल स्ट्रेंथ नेमकी किती आहे याची माहिती देखील येथे उपलब्ध होते.

दरम्यान, गुजरात येथे सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये गुजरातमधील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये आपण इंटरनेटनी जोडू असे आश्वासन रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिले आहे.