ट्रायने आदेश दिल्यानंतर रिलायन्सने जिओ समर ऑफर रद्द केली आहे. रिलायन्स जिओने तीन महिन्यांसाठी जिओ समर सरप्राइज ऑफर देऊ केली होती. ट्रायने ही ऑफर रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर या ऑफरचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  १५ एप्रिल पर्यंत ज्या ग्राहकांनी या ऑफरसाठी प्राइम मेंबरशिपची नोंदणी करुन ३०३ रुपये भरल्यास तीन महिन्यांची सेवा मोफत मिळणार होती. ही सेवा यापुढे मोफत देऊ नका असे आदेश टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने दिले आहेत. ज्या ग्राहकांनी हे आदेश मिळण्याच्या आधी प्राइम मेंबरशिप घेऊन ३०३ चे रिचार्ज केले आहे त्यांच्यासाठी ही ऑफर सुरू राहणार आहे असे जिओनी सांगितले.

या योजनेद्वारे १५ एप्रिलच्या आत जिओ प्राईमच्या ३०३ रूपयांच्या किंवा त्याहून अधिक किंमत असणाऱ्या प्लॅन्सची खरेदी करणाऱ्या जिओ प्राईमच्या सभासदांना ही सर्व्हिस आणखी ३ महिने मोफत मिळणार होती. जिओच्या या योजनेमुळे प्राईम ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, फ्री SMS सेवा, फ्री 4G डाटा यासारख्या अनेक सुविधा पुढचे तीन महिन्यांपर्यंत उपभोगता येणार होते. म्हणजेच ग्राहकांना आता एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत या सेवांचा मोफत लाभ घेता येणार होता.

* ज्यांनी १५ एप्रिलच्या आधी जिओची प्राइम मेंबरशिप घेतली आहे आणि ज्या ग्राहकांनी याचबरोबर ३०३ चा रिचार्ज केला आहे त्यांना ५ जीबी मोफत डेटा मिळेल अशी तरतूद या ऑफरमध्ये होती.
* ४९९ चे किंवा त्यापेक्षा अधिकचे रिचार्ज करणा-या ग्राहकांना १० जीबी मोफत फोरजी डेटा मिळणार असे त्यावेळी सांगण्यात आले होते.
* ज्या ग्राहकांनी फक्त ९९ रुपये भरून जिओ प्राईममध्ये सहभागी झाले आहेत त्यांना या समर सप्राईजचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी ३०३ रुपयांचे रिचार्ज करणे गरजेचे आहे.

ज्या ग्राहकांनी हे आदेश निघण्यापूर्वी ऑफरचा लाभ घेतला आहे त्यांना तीन महिन्यांसाठी मोफत सेवा मिळेल परंतु जे ग्राहक ६ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान नोंदणी करतील त्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच ग्राहकांना रिलायन्सकडून सेवा हवी असल्यास पैसे मोजावे लागणार आहेत.