‘रिलायन्स’ आता १५०० रूपयातला 4G ‘फीचर फोन’ बाजारात आणणार आहे. स्मार्टफोनचा जमाना येण्याआधी जे बटण असणारे फोन्स बाजारात उपलब्ध होते त्या फोन्सना फीचर फोन्स म्हणतात उदा. नोकिया ३३१५. पण फरक इतकाचा की हे फीचर फोन्स 4G स्मार्टफोन्ससारखे असणार आहेत आणि ते ‘रिलायन्स जिओ’ एक्सक्लुझिव्ह असणार आहेत. म्हणजे या फोन्सवर ‘रिलायन्स जिओ’चंच नेटवर्क वापरता येणार आहे.

रिलायन्सने उचललेलं हे एक प्रचंड मोठं पाऊल असून कमी दरांच्या हँडसेट्सच्या स्पर्धेत आता मुकेश अंबांनींची रिलायन्स उतरणार आहे. तसं म्हटलं तर रिलायन्सची स्वत:ची ‘लाईफ’ या नावाने हँडसेट्सची सीरिज आहे. पण या सीरिजमधले हँडसेट्स मध्यम ते महाग या कॅटेगरीमधले असल्याने त्याला प्रतिसाद तुलनेने कमी आहे.
१५०० रूपयांमधले हे 4G हँडसेट्स आले तर भारतामध्ये इंटरनेटच्या वापरात प्रचंड मोठी वाढ होईल. १५०० रूपयामधल्या 4G फीचर फोन जर वापरात आला तर निम्न मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेच्या जवळ असणाऱ्यांनाही 4G टेक्नॉलॉजी उपलब्ध होऊ शकेल. या स्वस्त फोन्सचं उत्पादन करण्यासाठी रिलायन्स चीनमधल्या ‘स्पीडट्रम, टेकचेन, युनिस्कोप आणि फॉर्च्युनशिप’ या कंपन्यांशी बोलंमीलस करत आहे.

यामध्ये रिलायन्सचाही मोठा फायदा होणार आहे. सध्या कमी दराच्या हँडसेट्सचं मार्केट चिनी मोबाईल फोन मेकर्सनी काबीज केलं आहे. शिओमी, झोलो, कूलपॅडसारख्या चिनी कंपन्यांचे कमी किंमतीच्या स्मार्टफोन्सना तुफान प्रतिसाद मिळतो आहे. शिओमी तर सॅमसंगखालोखाल भारतात सगळ्यात पसंतीचा ब्रँड आहे.

आता या सगळ्या ब्रँड्सना रिलायन्सची तगडी टक्कर मिळणार आहे. अर्थात १५०० रूपयामध्ये 4G फोन मिळत असेल तर कमी किंमतीचं स्मार्टफोन मार्केटमध्ये ‘हलचल’ नक्कीच होईल.