सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भांडारकर यांना दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री प्रीती जैन हिने चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने मधुरने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
न्या. एच. एल. दत्तू आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी करताना स्पष्ट केले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मधुर भांडारकर यांना आधीच दोषमुक्त केले आहे. तसेच जैन हिनेदेखील भांडारकर यांच्याविरोधात खटला पुढे चालू ठेवू इच्छित नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य करीत भांडारकर यांच्याविरोधातील खटला रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या खटला चालवण्याच्या निर्णयाविरोधात मधुर भांडारकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मधुर भांडारकर यांनी चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून १९९९ ते २००४ या काळात आपल्यावर १६ वेळा बलात्कार केल्याची तक्रार फिर्यादी अभिनेत्री प्रीती जैन हिने जुलै २००४ रोजी वसरेवा पोलीस ठाण्यात केली होती. भांडारकर यांनी लग्नाचे आमिषही दिल्याचा आरोप जैन हिने केला होता. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने जैन हिच्या तक्रारीची दखल घेत भांडारकरविरोधात खटला चालवण्याचा निर्णय दिला होता. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील स्थानिक न्यायालयाचा निर्णय मान्य केल्यामुळे भांडारकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.