21 September 2020

News Flash

धर्म हे संघर्षांचे कारण बनता कामा नये

धर्म हे संघर्षांचे कारण बनता कामा नये. सहिष्णुता आणि परस्परांविषयी सद्भावना कायम जपली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ६६व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला

| January 26, 2015 01:05 am

धर्म हे संघर्षांचे कारण बनता कामा नये. सहिष्णुता आणि परस्परांविषयी सद्भावना कायम जपली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ६६व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. महात्मा गांधीजींच्या साहित्याचा उल्लेख करत मुखर्जी यांनी धर्म हे एकात्मतेचे साधन असावे, असे प्रतिपादन केले. भारतातील पारंपरिक शिकवणुकीनुसार एकतेतच खरे सामथ्र्य आहे. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यात कमकुवतपणा असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेतील अशा उदात्त मूल्यांचे सर्वतोपरी जतन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
देशात कडव्या हिंदूत्त्ववाद्यांकडून घरवापसीसारखे कार्यक्रम राबवले जात असताना, गांधीजींचा मारेकरी गोडसेचे उदात्तीकरण केले जात असताना, हिंदूंची लोकसंख्येतील टक्केवारी वाढवण्यासाठी अधिकाधिक मुले जन्माला घालण्याची भाषा केली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपतींच्या या आवाहनाला विशेष महत्त्व आहे.
अशा विखारी भाषेने नागरिकांच्या मनातील जुन्या जखमा ताज्या होतात, असे राष्ट्रपती म्हणाले. भारताचा जगात सॉफ्ट पॉवर म्हणून उल्लेख केला जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी म्हणाले की, याचे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे सर्वात मोठे प्रत्यंतर म्हणजे जगातील अनेक देश धार्मिक हिंसेने ग्रस्त असताना भारत मात्र कायद्यासमोर सर्व धार्मिक श्रद्धा समान असल्याच्या तत्त्वांना प्रमाण मानून मार्गक्रमणा करत आहे. संपूर्ण स्वराज्य या संकल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता मुखर्जीनी म्हटले की, आपले शेजारी हिंसेचा वापर करण्यापासून परावृत्त होण्याची चिन्हे नसली आणि त्यांनी सीमांना सतत रक्तलांच्छित ठेवले असले तरीही आपण शांतता आणि अहिंसेला आपल्या परराष्ट्र धोरणात दिलेले स्थान सोडता कामा नये. मात्र आपण त्यांचे भारताच्या प्रगतीच्या आड येण्याचे मनसुबे स्वस्थपणाने पाहू शकत नाही. आपल्या नागरिकांविरोधात युद्ध छेडण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे मनोबल, धैर्य आणि क्षमता आमच्यात नक्कीच आहे, असेही राष्ट्रपतींनी खडसावले.
आर्थिक आघाडीवर देशात सध्या शुभसंकेत मिळत आहेत. देशात सध्या आशादायक वातावरण आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन्ही तिमाहींत पाच टक्के विकासदर हे आगामी काळात सात ते आठ टक्के विकासदर गाठण्याच्या मार्गाकडे जाण्याचे हे संकेत आहेत. त्याचबरोबर देशातील दारिद्रय़ाचे निर्मूलन करण्यासाठी सर्वसमावेशक विकासाला चालना देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.  देशाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

अध्यादेशांमुळे मतदारांच्या विश्वासाचा भंग
कायदे करताना चर्चेच्या माध्यमातून सर्वसहमती साधण्याऐवजी अध्यादेश काढणे म्हणजे मतदारांनी कायदेमंडळावर दाखवलेल्या विश्वासाचा भंग करण्यासारखे आहे आणि ते लोकशाहीला पोषक नाही, असे  मुखर्जी यांनी स्पष्ट केले. मतदारांनी त्यांचे काम केले आहे. यापुढे कायदेमंडळाची जबाबदारी आहे. सुसंस्कृत मार्गाने सर्वसहमतीसाठी चर्चा घडवून आणून लोकांच्या आकांक्षा सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रणाली स्थापित करणे याचे ते व्यासपीठ आहे. चर्चेशिवाय कायदे संमत करून अध्यादेश काढणे म्हणजे मतदारांचा विश्वासभंग  आहे ते लोकशाहीला घातक आहे असे बजावले .
*सहिष्णुता आणि परस्परांविषयी सद्भावना जपली पाहिजे
*दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यात कमकुवतपणा
*विखारी भाषेने नागरिकांच्या मनातील कटुता वाढते
*आपले शेजारी हिंसेचा वापर करत असले तरीही आपण शांतता आणि अहिंसेला आपल्या परराष्ट्र धोरणात दिलेले स्थान सोडता कामा नये.
*आर्थिक आघाडीवर देशात सध्या शुभसंकेत
*उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर देण्याची गरज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:05 am

Web Title: religion cannot be made cause of conflict president pranab mukherjee
टॅग Religion
Next Stories
1 दिल्लीत राजपथावर सातस्तरीय सुरक्षा
2 तोफांच्या सलामीने ओबामांचे राष्ट्रपती भवनात स्वागत
3 पोलीस दलातील ६८ जणांना राष्ट्रपतींचे पुरस्कार
Just Now!
X