राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या पुढाकाराने मुस्लिमांचे धर्मांतरण करण्याचा मुद्दा गुरुवारी लोकसभेमध्ये वादळी ठरला. या मुद्दयावरून विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी दिलेली प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची नोटीस लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणा देण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री वैंकय्या नायडू यांनी स्पष्ट केल्यानंतरही विरोधक ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते. हा विषय अत्यंत गंभीर असल्यामुळे सर्व नियम बाजूला ठेवून अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून धर्मांतरणाच्या मुद्दयावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या पुढाकाराने आग्रा येथे २०० मुस्लिमांचे धर्मातरण करण्याच्या उपक्रमाने विरोधकांचा तिळपापड झाला असतानाच अधिकाधिक मुस्लिम व ख्रिश्चनांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचा संघाचा अजेंडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्मातरणाच्या या ‘घर वापसी’ अभियानाला संघातील वरिष्ठांचा आशीर्वाद असून, त्यासाठी खास ५८ प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील जनगणनेत हिंदूंची संख्या वाढावी, हाच या अभियनामागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्यांचे पूर्वज हिंदू होते, मात्र काही कारणास्तव ज्यांनी मुस्लिम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचे अभियान संघाने चालवले आहे. या अभियानाचे फलीत म्हणून गेल्या पाच वर्षांत ५० हजार जणांनी धर्मपरिवर्तन केले. त्यांना पुढील वर्षी ऑगस्टमध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात उपस्थित केले जाऊन साधुसंतांचे आशीर्वाद दिले जाणार आहेत.
रंजित रंजन, पप्पू यादव, के. सी. वेणूगोपाल यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून धर्मांतरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी नोटिसीद्वारे केली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली.