अमेरिकेत असलेल्या विविध धर्माच्या लोकांमुळे या देशात धार्मिक वैविध्य तर येतेच, पण त्याशिवाय यामुळे देशाची सांस्कृतिक वीण घट्ट होते. राष्ट्राला एकत्र आणणारा संस्कृतीचा धागा दृढ होतो, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १६ जानेवारी हा दिवस यापुढे धर्मस्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे, त्याच्या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘हिंदू, शीख, ज्यू, ख्रिश्चन, बौद्ध, इस्लाम, आस्तिक, निरीश्वरवादी अशा सर्वानाच अमेरिका आपले मानते. आपल्याला जोडणारा खरा धागा हा आपला वर्ण, आपले कूळ, आपले नाव, धर्म, वंश नसून मानवता हा तो धागा आहे’, असे ते म्हणाले. स्वातंत्र्य, समता, न्याय, जीवनाचा प्रवाह निवडण्याचा एक समाज म्हणून आपल्याला असलेला हक्क यांतच आपले खरे अमेरिकीपण सामावलेले आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी, असेही त्यांनी या विशेष संदेशात नमूद केले.
‘‘धर्मस्वातंत्र्य जागतिक शांततेसाठी कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच, माझे प्रशासन अमेरिकेत तसेच जगभरात धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा प्रसार करण्यासाठी सदैव कटिबद्ध असेल.’’