27 September 2020

News Flash

आझम खान यांच्यावर संतापलेल्या रेणुका शहाणे म्हणतात..

रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं आहे

रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबतच अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये, असं देखील म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीदेखील रेणुका शहाणे यांनी त्यांची मते स्पष्टपणे नोंदविली आहेत.

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एका जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांमधून कडाडून टीका झाली. त्यासोबतच जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. या घटनेनंतर रेणुका शहाणे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

“महिलांचा आदर न राखता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान सारख्या व्यक्तींना कदापि निवडणुकीचं तिकीट देता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. प्रत्यक्षात कारवाईदेखील करणं गरजेचं आहे. ही कारवाई नक्की होईल का ? मुळात त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये”, असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं आहे.

दरम्यान, जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका सुरु झाल्यानंतर आझम खान यांनी आपण जया प्रदा यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्त्य केलेले नाही, असा दावा केला आहे. मात्र आझम खान यांच्याविरोधात सोमवारी महिलेवर हीन पातळीवर टीका केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2019 9:47 am

Web Title: renuka shahane says azam khan should not be allowed to fight this election
Next Stories
1 गंगाधर ही शक्तिमान है; भाजपाचा शरद पवार- राज ठाकरे यांना टोला
2 उत्तर प्रदेशात हिंसाचाराचा कट उधळला; दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X