गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, विविध राजकीय पक्षांकडून इव्हीएममध्ये छेडछाडी आणि तांत्रिकदृष्ट्या गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर येथील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. रविवारी सकाळी संबंधीत केंद्रांवर मतदान होणार आहे.


तीन मतदारसंघात फेरमतदान होणार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई, विरामगाम तर बांसकंथा जिल्ह्यातील वडगाम या केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतरही मतदान केंद्रांचा यात समावेश आहे.

दोन तीन केंद्रांवर एकाला मतदान केल्यानंतर काँग्रेसला पाठींबा दर्शवलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांच्या नावासमोरील दिवा लागत असल्याचे समोर आले होते. यामुळे स्थानिकांनी या मतदानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करुन येथे फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.


तर, दासक्रोई, विरामगाम येथील केंद्रांवर चाचणी मतदानादरम्यान घेतलेला मतदानाचा डेटा पुसण्याचे निवडणूक अधिकारी विसरुन गेले तसेच व्हीव्हीपॅटमधील पावत्या काढण्याचे राहून गेले त्यानंतर त्यावरच प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यावरही आक्षेप घेण्यात आल्याने येथेही फेरमतदान होणार आहे.

अशाच प्रकारच्या चुका या पहिल्या टप्प्यातील काही मतदान केंद्रांवरही दिसून आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय़ घेतला होता. या ठिकाणी गुरुवारी फेरमतदान झाले होते. यामध्ये जमजोधपूर, उमरगाम, उना आणि निझार या केंद्रांचा समावेश होता. फेरमतदानात येथे एकूण ८८.३० टक्के मतदानाची नोंद झाली.

सोमवारी गुजरातमध्ये सकाळपासूनच दोन्ही टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे.