केरळमध्ये नुकताच गेल्या शतकातील सर्वात मोठा पूर आला होता. यामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांचे यामध्ये प्राण गेले तर कित्येक कुटुंबे बेघरही झाली. येथील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी लष्कराने आपल्या प्राणाची बाजी लावली होती. या पुरादरम्यानच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत होत्या. आता पूर ओसरला असला तरीही काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. पुराच्या १० दिवसांमध्ये केरळमध्ये दारुची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. महाप्रलय आलेला असूनही या काळात राज्यात ५०० कोटींहून अधिक किमतीची दारुविक्री झाल्याचे ‘डीएनए’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

केरला स्टेट ब्रेव्हरेज कॉर्पोरेशनने सादर केलेल्या माहितीनुसार, पुराच्या १० दिवसांमध्ये म्हणजेच स्वातंत्र्यदिना(१५ ऑगस्ट) पासून ते ओणम (२६ ऑगस्ट) या सणापर्यंत राज्यात ५१६ कोटींची दारु विकली गेली. आता इतकी दारु लोकांना पुराच्या कालावधीत कशी उपलब्ध झाली हा काहीसा संशोधनाचा विषय आहे. पुरामध्ये राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान भरुन यायला मोठा कालावधी जावा लागेल. अजूनही ३.१६ लाख लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. जगभरातून केरळला मदतनिधी देण्यात येत असून अद्यापही बराच निधी आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या घराच्या आसपासचा भाग साफ होण्याची वाट येथील नागरिक पाहत असून साफसफाईचे काम वेगाने सुरु आहे. आपली घरे पुर्ववत करण्यासाठी नागरिकही मदत छावण्यांमधून घराकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.

पुर्नवसनाचे काम वेगाने सुरु असून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करणे, पडलेल्या पुलांची बांधणी करणे अशाप्रकारची कामे करण्यात येत आहेत. सध्या तात्पुरते २६ पूल सुरु करण्यात आले आहेत. यातील काही दुरुस्त करण्यात आले असून काही नव्याने बाणधण्यात आले आहेत. या पुरात प्राणी आणि पक्ष्यांचाही मृत्यू झाला आहे. ३.६४ लाख पक्षी आणि १७ हजारहून अधिक प्राण्यांचा समावेश आहे. केंद्राने केरळला आतापर्यंत ६०० कोटींचा निधी दिला असून यापुढेही आणखी देण्याची शक्यता आहे.