चीन आणि नेपाळने आगळीक केल्यानंतर भूताननेही भारताविरोधात दंड थोपटले असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. भूतानने भारताला मिळणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त देण्यात आलं आलं होतं. पण एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्य नाही. जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे.

काय होतं वृत्त –
भूतानने आसाममधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी रोखलं असल्याचं वृत्त होतं. यासोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर भूतानने परदेशी नागरिकांना देशात प्रवेश बंद केला असून यामध्ये भारतीय शेतकरी असल्याचीही चर्चा होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बक्सा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. सोमवारी आंदोलकांनी रोगिंया-भूतान रस्ता अडवला होता. केंद्र सरकारने भूतानसमोर हा मुद्दा उपस्थित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

काय आहे सत्य –
भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भूतानने हे वृत्त पूर्पणे फेटाळलं आहे. याउलट आसामला मिळणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वाहिन्यांमध्ये दुरुस्ती करण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बक्सा जिल्ह्यातील २६ पेक्षा जास्त गावांमधील जवळपास सहा हजार शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता डोंग प्रकल्पावर निर्भर आहेत. १९५३ पासून शेतकरी सिंचनासाठी भूतानमधील नद्यांच्या पाण्याचा वापर करत आहेत. शेतीची कामं सुरु झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शेतकरी भारत-भूतान सीमेवर जाऊन नदीचं पाणी आसामला मिळेल याची व्यवस्था करतात. पण प्रवेश नाकारला जात असल्याने पाणी मिळणार नाही असाही दावा केला जात होता.