‘आदर्श’ गैरव्यवहारप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जातीयवादी ठरवून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी शुक्रवारी दिल्लीत स्वतच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ‘आदर्श’ वरून विचारलेला प्रश्न खोब्रागडेंना चांगलाच झोंबला.
नवीन महाराष्ट्र सदनात शुक्रवारी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. देवयानी प्रकरणावरील निवेदनानंतर एका मराठी पत्रकाराने खोब्रागडे यांना आदर्शप्रकरणी छेडले. ‘आदर्श’ गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी अहवालात देवयांनीनी तुम्हाला सर्वाधिकार दिल्याचे उघडकीस आले, त्यातील अनियमिततेबाबत तुमची भूमिका काय असे विचारले असता, खोब्रागडे यांनी उपस्थित मराठी पत्रकारांना उद्देशून ‘तुम्ही सारे जातीयवादी आहात. तुमची जातीयवादी मनोवृत्ती गेलेली नाही. ती अगोदर दूर करा’, असे उलटपक्षी सुनावले.  
अमेरिकेतील प्रकरणानंतर देवयानी शुक्रवारी मायदेशी येण्यास निघाल्या. त्यांना राजनैतिक विशेषाधिकार बहाल करण्यात आल्याने अमेरिका सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. देवयानी परतणार असल्या तरी मोलकरणीला कमी वेतन देण्याच्या प्रकरणावरून त्यांच्यावर  १३ जानेवारीपासून खटला चालवण्यात येणार आहे.