पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं पु्न्हा एकदा उल्लंघन केलंय. भारतीय सेनेनेही त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे. एएनआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

या परिस्थितीवर केंद्र सरकार आणि गृहमंत्रालय लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल कुमार यांनी दिली आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असल्याने काश्मीरमधील प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यास स्थानिक प्रशासनाने सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानकडून राजौरी सेक्टरमध्ये गोळीबार सुरु असल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. गोळीबारासह उखळी तोफांचा मारादेखील सुरु असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने स्थानिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत १ हजार लोकांचे स्थलांतर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून या महिन्यात अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. गेल्या रविवारी पाकने नौशेरातील नियंत्रण रेषेवरील भागांमध्ये पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा केल्याने डोंगराळ भागात आग लागल्याच्या घटना घडल्या. डोंगराळ भागांमध्ये लागलेल्या आगीचा धूर नौशेरा शहरातून दिसून आला. त्या दिवशी १ हजार लोकांना पोलिसांनी बुलेट प्रूफ बंकर्समधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शनिवारीही सकाळी पाकिस्तानकडून नाहक गोळीबार सुरू करण्यात आला. पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्टारचा मारा केल्यामुळे दोन भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याआधीही दोन दिवस पाकिस्तानकडून आगळीक करणं सुरू होतं. पाकिस्तानच्या या खुसपटं काढण्याच्या सगळ्या प्रयत्नांना भारतीय जवानांनी चोख प्रत्त्युत्तर दिलं