उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठामध्ये (बीएचयू) मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याच्या वृत्ताची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या नियुक्तीवरून वादही पेटू लागला आहे. मंगळवारी विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी कुलगुरू राकेश भटनागर निवेदनही दिलं. दरम्यान, या वृत्तावर आता रिलायन्स उद्योग समूहानेच खुलासा केला आहे.

बनासर हिंदू विद्याठातील सामाजिक शास्त्र विद्याशाखेनं नीता अंबानी यांना मानद प्राध्यापक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं वृत्त समोर आलं होतं. नीता अंबानी यांनी विद्यापीठामधील महिला अभ्यास केंद्रामध्ये मानद प्राध्यापक म्हणून सहभागी व्हावे, अशी विनंती पत्रात केल्याचंही वृत्तामध्ये म्हटलेलं होतं. या वृत्तानंतर विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांनी विरोधाचा सूर लावला आहे.

नीता अंबानी मानद प्राध्यापक होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता रिलायन्स उद्योग समूहाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. “नीता अंबानी या बनारस हिंदू विद्यापीठात मानद प्राध्यापक होणार असल्याचं खोटं आहे. त्यांना अद्याप कोणताही प्रस्ताव विद्यापीठाकडून मिळालेला नाही,” असं रिलायन्स उद्योग समूहाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

अदानी यांच्या पत्नीच्या नावाचीही चर्चा

विद्यापीठातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानद प्राध्यापक पदासाठी दोन जागांपैकी एका जागेवर उद्योगपती गौतम अदानी यांची पत्नी प्रिती अदानी यांना नियुक्त करण्याचं विचाराधीन असल्याचं म्हटलं होतं. दोन दशकांपूर्वी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला अभ्यास केंद्रातील मानद प्राध्यापक पदासाठी तीन नियुक्त्या बाकी असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे.

“महिला सशक्तीकरणासंदर्भात आम्ही संशोधन करतो. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आमच्याकडे उपलब्ध आहे. बीएचयूच्या परंपरेनुसार सामजसेवा करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा मानद प्राध्यापक म्हणून समावेश करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाऊण्डेशनच्या नीता अंबानी यांना महिला अभ्यास केंद्रामध्ये येण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यांच्या अनुभवाचा आमच्या महिला अभ्यास केंद्राला फायदा व्हावा, या हेतूने ही विचारणा करण्यात आलेली आहे. महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्स फाऊण्डेशन बरंच काम केलं आहे, त्यामुळेच आम्ही ही विचारणा केली,” अशी माहिती सामाजिक शास्त्र विभागप्रमुख कौशल किशोर मिश्रा यांनी म्हटलं होतं.