केरळमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

प्रजासत्ताक दिनी पलक्कडमधील एका शाळेत मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोहन भागवत यांच्या ध्वजारोहणावरुन वादही सुरु होता. राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध विभागांच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे परिपत्रक काढून केरळ सरकारने मोहन भागवत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे आदेश मोडून मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले.

केरळला रवाना होण्यापूर्वी गुरुवारी मोहन भागवत मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. लोकं जातीच्या आधारे मतदान करतात म्हणून जातीचे राजकारण सुरु आहे. लोकांचे विचार बदलल्यास समाजातही बदल होईल, असा दावा त्यांनी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून केरळमध्ये भाजप आणि रा. स्व. संघ आपले बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या दरम्यान, अनेकदा संघ आणि डाव्यांमध्ये संघर्ष पहायला मिळाला आहे. सन २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदा आपल्या नागपूर येथील मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकावला होता. शुक्रवारी संघाच्या मुख्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले.