भारतीय हवाईदलाचे गरुड कमांडो जे. पी. निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान प्रदान करण्यात आले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना जे. पी. निराला शहीद झाले. निराला यांच्या आई आणि पत्नीने अशोक चक्र सन्मान स्विकारले, हा सन्मान त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपल्या भावना अनावर झाल्या. निराला यांनी काश्मिरमध्ये गाजवलेल्या शौर्याचे वर्णन ऐकून राष्ट्रपती भावुक झाले.

१७ नोव्हेंबर २०१७ रोजी श्रीनगरमध्ये हाजिन येथील चंदरगीर गावात लष्कराने केलेल्या कारवाईत निराला यांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईत एकूण ६ दहशतवादी मारले गेले होते. निराला यांच्या शौर्याचं वर्णन ऐकताना राष्ट्रपती कोविंद यांना भावना अनावर झाल्या. निराला यांची शौर्य गाथा ऐकून त्यांचे डोळे पाणावले. अशोक चक्र प्रदान केल्यानंतर राष्ट्रपतींनी रुमाल काढून आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले. निराला यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सुषमा आणि ४ वर्षांची मुलगी जिज्ञासा आहे.