प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये यंदा भारतीय हवाई दलाची २७ विमाने सहभागी होणार आहेत. या विमानांकडून होणाऱ्या प्रात्यक्षिकांची सुरुवात चार एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर्सने होणार आहे. हे हेलिकॉप्टर्स इंग्रजीतील ‘वाय’ अक्षराच्या आकाराने संचलन मार्गावरून जातील.
दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन एमआय ३५ हेलिकॉप्टर्स संचलनामध्ये सहभागी होतील. ही हेलिकॉप्टर्स ‘Vic’ आकाराने राजपथावरून जाणार आहेत. त्यानंतर तीन सी-१३०जे सुपर हर्क्युलस विमाने राजपथावरून जातील.
लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकामध्ये पाच जॅग्वार, पाच मिग-२९ आणि तीन सुखोई ३० एमकेआय यांचा समावेश असेल. विमानांच्या साह्याने दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचा शेवट हे नेहमीप्रमाणे सुखोई ३० एमकेआय जातीच्या लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांनी होणार आहे.
राजपथावरून होणाऱ्या संचलनामध्ये हवाई दलाचे दोन पुरुष आणि दोन महिला अधिकारी आणि १४४ जवान सहभागी होणार आहेत. हवाई दलाचा चित्ररथही संचलनात सहभागी असणार असून विविध नैसर्गिक संकटांच्या काळात हवाई दलाकडून सामान्य जनतेला करण्यात आलेल्या मदतीची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.