राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे केलेल्या भाषणात नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना, या कायद्यांमुळे लहान शेतकऱ्यांना लाभ मिळून लागल्याचे नमूद केले. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा ‘अतिशय दुर्देवी’ अशा शब्दांत त्यांनी निषेध केला.

नव्या कृषी कायद्यांबाबत राष्ट्रपती म्हणाले, या कायद्यांचा लाभ १० कोटी लहान शेतक ऱ्यांना झाला आहे. काही राजकीय पक्षांनी आधी या कायद्यांमधील तरतुदींना पाठिंबा दिला होता. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना ते म्हणाले, की जर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असेल तर त्याचा वापर कायदा आणि नियम पाळून गांभीर्याने करणे अपेक्षित आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राष्ट्रपती कोविंद यांनी केलेल्या पारंपरिक भाषणात भारत-चीन संघर्षांसह अनेक मुद्दय़ांचा परामर्श घेतला. चीनचा उल्लेख टाळून राष्ट्रपती म्हणाले की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शांततेत बाधा आणण्याचे प्रयत्न असून त्यामुळे द्विपक्षीय संबंध आणि करारांचा अनादर होत आहे. परंतु भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास कटिबद्ध असून त्यासाठी सीमेवर अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान येथे २० जवानांनी चीनविरुद्धच्या संघर्षांत केलेले प्राणार्पण हा सर्वोच्च त्याग आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

२० विरोधी पक्षांचा बहिष्कार

राष्ट्रपती कोविंद यांच्या तासाभराच्या भाषणावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस खासदार रवणीत सिंग बिट्टू यांनी भाषणावेळी ‘जय जवान जय किसान’च्या घोषणा दिल्या. काही विरोधी खासदारांनी सेंट्रल हॉलच्या सज्जात घोषणाबाजी केली.

भाषणसंक्षेप

* सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना दिलेल्या स्थगितीचा केंद्र सरकारला आदर., कृषी सुधारणांतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण.

* थेंबागणिक जास्त पीक योजनेची अंमलबजावणी, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र ४२ लाख हेक्टरवरून ५६ लाख हेक्टरवर.

* प्रधानमंत्री किसान योजनेत शेतक ऱ्यांना १,१३००० कोटी रुपयांची मदत थेट हस्तांतरित.

* एक हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार.

* यूपीआय पद्धतीच्या माध्यमातून डिसेंबर २०२० पासून चार लाख कोटी डिजिटल व्यवहार झाले असून दोनशे बँकांची ‘यूपीआय’शी जोडल्या.

* करोना नियंत्रणाबाबत सरकारने वेळीच घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. अर्थव्यवस्थाही रूळावर येण्यास सुरुवात.

* अवकाश क्षेत्रात सुधारणांसाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अ‍ॅथॉरायझेशन सेंटर म्हणजे ‘इन-स्पेस’ या संस्थेची स्थापना.