रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत या हिंदी वृत्तवाहिनीला युनायटेड किंग्डममधील संवाद नियामक कार्यालाने काही दिवसांपूर्वीच मोठा झटका दिला. युकेमधील ऑफकॉमने वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क लिमीटेडला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र आता या दंडाच्या बातमीनंतर रिपब्लिक टीव्हीसंदर्भातील आणखीन एका महिती समोर आली असून अर्बण यांच्या वृत्तसमुहाने या नियामक कार्यालाने घेतलेल्या आक्षेपावर तब्बल २८० वेळा माफी मागिल्याचा दावा करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवरुन युकेमध्ये २६ फेब्रुवारी २०२० ते ९ एप्रिल २०२० दरम्यान द्वेष पसरवणारे वृत्तांकन केल्याप्रकरणी २८० वेळा माफीनामा दाखवण्यात आला. अर्णब यांनी पुछता है भारत या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेल्या मतांबद्दल आक्षेप नोंदवला होता. ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमामध्ये अर्णब यांनी बोलावलेल्या तज्ज्ञांबद्दल उच्चारलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवण्यात आला.

६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शीत झालेला हा भाग भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात होता. या भागामध्ये भारत आणि पाकिस्तानची तुलना करण्यात आली होती. भारतातील अवकाश संशोधन आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तान हा भारतावर सतत दहशतवादी हल्ले करणारा देश असल्याचा उल्लेख केल्याचं, संवाद नियामक कार्यालाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. वृत्तवाहिनीचा सर्व कारभार पाहणाऱ्या ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार हा आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर वृत्तवाहिनीवर चालवण्यात आलेल्या माफीनाम्यामध्ये “संवाद नियामक कार्यालय, द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आलेला पुछता है भारतचा भाग पाहून त्यामध्ये वापरण्यात आलेल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला आहे. या शब्दांमुळे काही दर्शकांच्या भावना दुखवल्या गेल्या. या शब्दांमुळे कोणात्याही धर्मातील व्यक्तींच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखवाल्या गेल्या असतील तर रिपब्लिक मिडिया नेटवर्क त्यांची माफी मागत आहे,” असं म्हटलं होतं.

“पाकिस्तानमधील लोकांबद्दल द्वेष परसवणारी माहिती या कार्यक्रमामध्ये होती. तसेच या भागामध्ये पाकिस्तानमधील व्यक्तींना दुय्यम वागणूक देत त्यांच्याविरोधात द्वेष परसवरण्याच्या उद्देशाने भाष्य करण्यात आलं,” असं द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने म्हटलं आहे. “त्यांचे वैज्ञानिक, डॉक्टर्स, नेते आणि सर्व राजकारणी हे दशतवादी आहेत. त्यांचे सर्व खेळाडूही. तेथील सर्व मुलंही दहशतवादी आहेत. तेथील प्रत्येक लहान मुलं दहशतवादी आहे,” असं वक्तव्य या भागामध्ये अर्णब आणि इतर पाहुण्यांनी केलं होतं असंही द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्वत:चा काँग्रेसचे स्वयंसेवक असा उल्लेख करणाऱ्या निखिल अल्वा यांनी ट्विटरवरुन या पत्रातील माफीचा उल्लेख असणारा स्क्रीनशॉर्ट ट्विटरवरुन शेअर केला आहे.

या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या जनरल सिन्हा यांनी पाकिस्तानमधील नागरिकांचा उल्लेख भिकारी असा केला होता. तसेच पाकिस्तानवर हल्ला करण्याचा इशाराही सिन्हा यांनी दिला होता. यावरही द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने आक्षेप नोंदवला आहे. त्याचप्रमाणे पाकी हा शब्द द्वेष पसरवणारा आणि युकेमधील दर्शकांमध्ये मान्य होणार नसल्याचं निरिक्षणही द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने नोंदवलं आहे.