अमेरिकेत आलेल्या ‘रिपब्लिकन सुनामी’चा डेमोक्रॅटिक पक्षाला जोरदार तडाखा बसला आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने ‘डेमोक्रॅटस्’चे सिनेटवरील वर्चस्व मोडीत काढतानाच प्रतिनिधीगृहामधील आपल्या आधिक्यात वाढ केली. प्रतिनिधीगृहाच्या (काँग्रेसच्या) ४३५ जागांसाठी तसेच सिनेटमधील ३६ जागांसाठी घेण्यात आलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्ष बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. ओबामा यांना २००८ मध्ये अध्यक्षपदी बसवण्यात अग्रेसर भूमिका बजावणाऱ्या नॉर्थ कॅरोलीना, कोलोरॅडो आणि आयोवा या तीनही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाने ‘डेमोक्रॅटस्’ना धूळ चारली आहे. या विजयामुळे २००६ नंतर प्रथमच सिनेटवर वर्चस्व मिळवण्यात रिपब्लिकन पक्षाला यश आले आहे.  या निकालांनंतर आता ओबामा यांना आपली अध्यक्षपदाची अखेरची दोन वर्षे रिपब्लिकन वर्चस्वाशी ‘जुळवून घेत’ काढावी लागणार आहे.
ओहायो प्रतिनिधीगृहात २३ वर्षीय भारतीय
अवघ्या तेविसव्या वर्षी थेट ओहायो प्रतिनिधीगृहाचे सदस्यत्व मिळविण्यात भारतीय तरुण यशस्वी झाला आहे. नीरज अंतानी असे या युवकाचे नाव आहे. गेल्याच वर्षी डेटन विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या नीरजचा प्रतिनिधिमंडळावर जिंकून येणाऱ्या सर्वात तरुण लोकप्रतिनिधींच्या यादीत समावेश झाला आहे.