ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास बंगळुरू पोलीस करत आहेत. मात्र, पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही, असे लंकेश यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी केली आहे. सीबीआयच्या तपासात सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने याआधी ज्येष्ठ विचारवंत कलबुर्गी यांच्या हत्येचा तपासही केलेला आहे. मात्र, अद्याप ते कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाबाबतही हीच गत होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

इंद्रजित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “गौरी एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना कोणतीही धमकी मिळाली नव्हती.” दरम्यान, या संपूर्ण घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ते मला आणि माझ्या आईला दाखवण्यात यावे, अशी मागणीही इंद्रजित यांनी बंगळुरू पोलिसांकडे केली.

गौरी लंकेश यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गींनंतर लंकेश यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरू पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर त्यानं सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. संदीप असे या तरुणाचे नाव असून त्याचा आणि हल्लेखोरांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत आहेत.