१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत एकूण ७३६ अफगाणी नागरिकांनी भारतात नव्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) नावांची नोंद केली असून; अफगाणी नागरिकांची भारतात नोंदणी व मदत याबाबत वाढणाऱ्या विनंत्या विचारात घेण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवत आहोत, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या येथील उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सांगितले.

अफगाणी नागरिकांना व्हिसा जारी करणे व त्याची मुदत वाढवणे, मदत करणे आणि त्यांच्या अडचणींवर तोडगा शोधणे यासंबंधीच्या प्रकरणांबाबत आपण सरकारशी सतत संपर्कात आहोत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांबाबतच्या या संस्थेने दिली.

आकडेवारीनुसार, यूएनएचसीआरचा संबंध असलेल्या भारतातील व्यक्तींची एकूण संख्या ४३,१५७ इतकी आहे. यापैकी १५,५५९ लोक अफगाणिस्तानातील निर्वासित आणि आश्रय मागणारे आहेत. ‘१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत ७३६ अफगाणी लोकांची यूएनएचसीआरने नव्या नोंदणीसाठी नोंद केली,’ असे संस्थेने सांगितले.

यूएनएचसीआरशी संपर्क साधलेल्या लोकांमध्ये २०२१ साली नव्याने आलेल्या अफगाणी व्यक्ती, यापूर्वी आश्रय मागण्यासाठी करण्यात आलेली बंद प्रकरणे पुन्हा खुली करण्याची मागणी करणारे लोक, विद्यार्थी, उद्योजक किंवा अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे परत न जाऊ शकणारे वैद्यकीय किंवा इतर प्रकारच्या व्हिसांवर आलेले लोक यांचा समावेश आहे.