ओबामा यांचे सुरक्षा परिषदेत वक्तव्य
इंडोनेशियासह जगाच्या इतर भागांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या परिणामांचा विचार करून, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा नि:पात करण्यासाठी जगातील देशांनी व्यापक समन्वय आणि सहकार्य करण्याच्या आवश्यकतेवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भर दिला आहे.
आयसिसचे खच्चीकरण करून तिला नष्ट करण्याची आपली मोहीम तीव्र करण्याबाबत चर्चा केली जाणे आवश्यक असल्याचे ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला सांगितल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
इराकी फौजांनी रमादी शहर बंडखोरांच्या ताब्यातून घेऊन केलेली प्रगती, तसेच आयसिसचा सामना करण्यासाठी अमेरिका व तिच्या भागीदारांनी सीरिया व इराकमधील शक्य त्या आघाडय़ांवर उघडलेली लष्करी मोहीम याबाबत अध्यक्षांना या वेळी माहिती देण्यात आली. यानंतर, आयसिसचा पाडाव करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तीव्र करण्याचे निर्देश ओबामांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा चमूला दिले.